menu

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम्ॐकारममलेश्वरम्॥१॥ परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरम्। सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥२॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशं च शिवालये॥३॥ एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्याणमि |

दैनिक पूजा


रोज पहाटे 5 वाजता श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने अधिकृत पुरोहितकडून निजलिंगावर अभिषेक, आरती व नैवेद्य दाखवून रोजच्या दर्शनास सुरवात होते .

दैनिक अभिषेक व दर्शन व्यवस्था (सोमवार, प्रदोष व शिवरात्री सोडून )

वेळ दर्शन पद्धत अभिषेक
सकाळी 5 ते 7 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते निजलिंगावर अभिषेक करता येतो
सकाळी 7 ते 12 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते अभिषेक बंद असतात
दुपारी 12 ते 3 निजलिंगाचे स्पर्शदर्शन होते निजलिंगावर अभिषेक करता येतो
पुढे वाचा

दैनिक पंचांग


वार :

तिथी :

नक्षत्र :

महत्वाचे सन-उत्सव


  • गुढीपाडवा
    वर्ष प्रतिपदेला म्हणजेच गुडीपाडव्याला श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात गुढी उभारण्याचा समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याच वेळेस वस्त्र, दागिने व फुलांनी सजवून ‘श्री’ ची अलंकार पुजा होते. मंदिर शिखरावरील निशाण(झेंडा) बदलले जाते. पाडव्याच्या दिवशी विधिवत पूजा करून नवे निशाण शिखरावर बांधले जाते. श्री प्रभू वैजनाथच्या स्पर्शाने जणू वस्त्रालंकार स्वत:च भूषित होतात. देवस्थानच्या पदाधिकार्‍याच्या हस्ते ही पूजा केली जाते. या दिवशी स्थानिक भाविक गूळ, साखर, नारळ, खोबरे प्रसाद शेरणी म्हणून वाटतात. ही शेरणी प्रसाद वाटण्याची परंपरा येथे पूर्वापार चालत आलेली आहे. रात्री उशिरापर्यन्त भाविकांची गर्दी मंदिरात असते. ज्योतिर्लिंग परळी येथील श्री वैजनाथ प्रभू चे दर्शन घेऊनच येथील भक्तांचे नववर्ष सुरू होते. हा गुडीपाडव्याचा धार्मिक उत्सव संपन्न होतो.
  • श्रावणमास उत्सव
    श्रावणमास उत्सवातही ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या गर्दीने गजबजलेले असते. महिनाभर अनेक भाविक ज्योतिर्लिंगाची रुद्राभिषेक पूजा करतात. १०८ बिल्वपत्र शंकरास अर्पण करण्याची येते जुनी परंपरा आहे. काही भक्त महिनाभर एक लाख बिल्वपत्र ज्योतिर्लिंगास अर्पण करतात. यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही भाविक येथे दर्शनास येतात. श्रावण महिन्यात गोदावरी गंगेचे जल कावडीने आणले जाते. या पवित्र जलाने वैजनाथला रुद्राभिषेक केला जातो. मंत्र व जप, शिवनामाने मंदिर गजबजून जाते. श्रावणी सोमवारी या ठिकाणी लाखो भाविक ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पुण्य पदरात पडून घेतात. स्थानिक भाविक देव दर्शनानंतर मंदिरा परिसरातील ‘मेरू’ पर्वताला प्रदक्षिणा घालतात. हि प्रदिक्षणा केल्यास कैलासलोक प्राप्त होतो व प्रभू शिव आणि विष्णू यांचे सानिध्य लाभले अशी भाविकाची श्रद्धा आहे. गोदावरी नदीकाठचे अनेक भाविक श्रावण महिन्यात पायी चालत येतात. गोदावरी जल कावडीने आणतात. याच जलाने अभिषेक घालतात. यास ‘ज्योतिर्लिंग वैजनाथाची कावड’ असे संबोधले जाते. महिनाभर अखंडपणे हा उपक्रम परळी येथे चालू असतो. तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांचा जनसागर उसळतो. अधिक मासातही महिनाभर भाविकांनी मंदिर गजबजलेले असते. श्रावणी सोमवारी दर्शनासाठी विशेष दर्शनपास ची व्यवस्था मंदिर समिति कडून केली आहे .
  • श्री वैजनाथप्रभू दसरा पालखी उत्सव व श्री   कालरात्री देवी नवरात्री उत्सव विजयादशमी
    विजयादशमीला श्री वैजनाथ प्रभूची पालखी मिरवणूक काढली जाते. श्री वैजनाथाची उत्सवमूर्ती भक्तांच्या लवाजम्यासह वाजत-गाजत सीमोल्लंघन करून येते. या दिवशी जोतीर्लींगाची अलंकाराने पूजा केली जाते. सायंकाळी पारंपारिक पद्धतीने भगवान शंकराच्या पालखीची मिरवणुक निघते. हि पालखी श्री कालरात्री देवी मंदिर परीसरात आल्यानंतर शोभेची दारू उडवली जाते. त्यानंतर श्री वैजनाथप्रभू व श्री कालरात्री देवीच्या पालख्या सीमोल्लंघनासाठी शहराच्या परिसरातील श्री बटूभैरव मंदिराकडे मार्गस्थ होतात. श्री वैजनाथ प्रभू यांच्या श्री कालरात्री देवी या भगिनी आहेत, त्या श्री वैजनाथप्रभूची प्रतीक्षा करत असतात , म्हणून विजयादशमीला श्री वैजनाथाकडून कालरात्री देवीस साडी चोळीचा आहेर देण्याची पारंपारिक पद्धत आहे. यावेळी देवीची खणा नारळाने ओटी भरली जाते. रात्री उशिरापर्यंत या पालख्या मिरवणुका चालतात. दोन्हीही पालख्या प्रभू वैजनाथच्या मंदिरात येतात. या ठिकाणी मुख्य मंदिराला पालखीच्या प्रदक्षिणा होतात. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची मंदिरात गर्दी उसळलेली असते. या कार्यक्रमानंतर श्री कालरात्री देवीची पालखी श्री वैजनाथ मंदिरातून बाहेर पडते. त्यानंतर दसरा उत्सवाची सांगता होते.
  • त्रिपुरारी पोर्णिमा व वैकुंठ चतुर्दशी (हरिहर भेट)
    कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा एकमहिना हा उत्सव साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी विश्वस्ताच्या वतीने देवस्थानचे सेक्रेटरी सपत्नीक प्रथम महापुजा करतात, त्यानंतर परळी व पंचक्रोशीतील मानकरी भाविक भक्त यांच्या हस्ते महिनाभर पुजा होतात .
    कार्तिक शुद्ध चतुर्दशी या दिवशी हि ज्योतिर्लिग परळी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराकडून विष्णूला सुदर्शन चक्राची प्राप्ती झाली असेही सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात महापूजा होते. भगवान शंकराला तुळशीपत्र आणि भगवान विष्णूला बिल्वपत्र अर्पण करण्याची वेगळी प्रथा या ठिकाणी प्रचलित आहे. हा पूजेचा सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त तासंतास मंदिरात उभे असतात.तसेच हरिहार तीर्थावर भगवान महादेव व भगवान विष्णु यांची गळाभेट झाल्याची आख्याईका आहे त्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक रात्री बारा वाजता एकमेकांची गळाभेट घेतात . त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी विश्वस्ताच्या वतीने देवस्थानचे सेक्रेटरी सपत्नीक महापुजा करतात व सांगता होते . भगवान शंकर हे दुष्ट प्रवृतीचा नाश करणारी देवता आहे. हि ऐतिहासिक लोकभावना येथे निर्माण होते असेही म्हणता येते. या दिवशी संपूर्ण ज्योतिर्लिंग मंदिरात प्रसन्न वातावरण निर्माण होते. प्रसन्न वातावरण आणि पवित्रता यामुळे भक्तांच्या मनात सद्भावना जागृत होते. म्हणून या ठिकाणी साजरे होणारे उत्सव सांस्कृतिक परंपरा जतन करणारेच आहेत.
  • दिवाळी पाडवा
    ज्योतिर्लिंग परळी या ठिकाणी दिवाळीच्या पाडव्याला ‘श्री’ ची अलंकार पूजा मांडली जाते. संपूर्ण दीपमाळ दिव्यांनी सजविले जाते. दिवाळीच्या चारही दिवशी हजारो भाविक ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पाडव्याला अधिक गर्दी असते.
  • मकरसंक्रांती
    मकरसंक्रांतीच्या दिवशी हि या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते. ज्योतिर्लिंगाची अलंकार पूजा मांडली जाते. मकरसंक्रातीला महिला भाविकांची अधिक गर्दी होते. माता पार्वतीला या दिवशी मान असतो. महिला भाविक माता पार्वतीची संक्रांतीच्या वाणाने ओटी भारतात. या दिवशी स्थानिक कामगार, हमाल,मापाडी,कष्टकरी,शेतकरी यांची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक निघते. साखर,नारळ,खोबरे,गुळ,तीळ हे पदार्थ शेरणी संक्रांती निमित्त प्रसाद म्हणून वाटले जातात.
  • महाशिवरात्री
    श्री ज्योतिर्लिंग परळी वैजनाथाचा महाशिवरात्रीस मोठा उत्सव साजरा होतो. या उत्सवाची तयारी अगोदर एक महिन्यापासून सुरु असते. संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी केली जाते. साफसफाईही केली जाते.महाशिवरात्रीला भरणाऱ्या वार्षिक यात्रा उत्सवात लाखो भाविक ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. यावेळी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. शेकडो महिला भाविक या दिवशी मंदिर परिसरात शिवरात्र वात पाजळतात. हि जुनी प्रथा येथे आजतागायत चालू आहे. शिवरात्रीचा उत्सव पाच दिवस चालतो.
    • पहिल्या दिवशी रात्री १२ वाजल्या पासून भाविक भक्त ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी रांगा लावतात.
    • दुसऱ्या दिवशी मा.जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते श्री वैजनाथाची शासकीय महापूजा संपन्न होते , शासकीय पूजेनंतर सर्वसामान्य भाविक मर्यादित प्रमाणात पूजा,अभिषेक करतात.महाशिवरात्रीचे दिवशी कासव गाभर्‍यातून मुखदर्शन घेता येते .
    • तिसर्‍या दिवशी महाशिवरात्रीच्या महापूजेचे प्रयोजन म्हणून ब्राह्मण भोजन व महाप्रसादाचे भोजन सर्व भाविकांना देवस्थान मार्फत दिले जाते.
    • चौथ्या दिवशी ज्योतिर्लिंग वैजनाथांची पारंपरिक पद्धतीने पालखीतून मिरवणूक सायंकाळी ५ वाजता काढली जाते.पालखी मिरवणूक निघण्यापूर्वी दक्षिणमुखी गणेशाची आवाहन करून पूजा केली जाते सर्व मानकरी पूर्वदरवाजाने येतात .सर्व विश्वस्त यांच्या उपस्थितीत सेक्रेटरी मार्फत प्रभू वैजनाथला आहेर केला जातो ही पालखी वैजनाथ गल्ली – देशमुख पार – आंबेवेस – गणेशपार – नांदुर्वेस – भोईगल्ली – मार्गे मंदिरात परत येते पालखीची मिरावणूक देशमुख पारवर आल्यानंतर तेथे नामवंत शास्त्रीय गायक यांच्या भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम होतो. सरस्वती नदीजवळ आतषबाजी शोभेची दारू उडविली जाते. नांदूरवेस, गणेशपार भागात पालखीपुढे कलावंताच्या हजेरीचा कार्यक्रम होतो.गोपणपाळे गल्लीत पालखी मिरवणुकीत स्थानिक कलावंत संगीत रचना सदर करतात. संपूर्ण गावात पालखी मिरवली जाते.मानकरी भोई असल्यामुळे प्रभू वैजनाथांची पालखी भोई गल्लीतून रात्री उशिरा मंदिरात पोहचते.ज्योतिर्लिंग पालखी मिरवणूक मार्गावर शहरातील भाविकांकडून सडा काढला जातो, दारोदार रांगोळी काढली जाते. शेकडो भाविक यावेळी पालखीचे दर्शन घेतात. भगवान शंकर आपल्या दरी आल्याचा आनंद यावेळी परळीकराना होतो. या पालखी मिरवणुकीने यात्रा उत्सवाची सांगता होते.
    • पाचव्या दिवशी मंदिरात महाशिवरात्र व पालखीवेळी सेवा करणाऱ्या सेवेकाऱ्यांना देवस्थान संस्थेतर्फे बिदागी देण्याचा कार्यक्रम होतो. महाशिवरात्रीला लाखो भाविक परळीत दर्शनाला येतात. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान संस्थान विविध उपक्रम राबवते. शहरातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी,उद्योजक, सर्वसामान्य नागरिकही भाविकांसाठी मोफत फराळ वाटतात. जागोजागी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. मोफत औषधोपचार आणि विविध मदत केंद्रही चालविले जाते. लाखो भाविक या सेवेचा लाभ घेतात.

परळीतील तीर्थक्षेत्रे


  • हरिहर तीर्थ
    हे तीर्थ श्री वैजनाथ मंदिराच्या दक्षिणेस थोड्याच अंतरावर आहे. देवालयाच्या दक्षिण दरवाज्याकडील घाट या तीर्थावर जाण्याकरताच बांधलेला आहे. लांबी-रुंदीच्या मानाने हे तीर्थ सर्वात मोठे आहे. या तीर्थाची दक्षिणोत्तर लांबी २०० हात असून पूर्व-पक्षिम रुंदी १०० हात असावी. पूर्व, पश्चिम आणि उत्तर या तीन दिशांनी आत उतरण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत. श्री वैजनाथ क्षेत्राप्रमाणे हे तीर्थ हरीहरात्मक असल्याने याचा महिमा मोठा आहे. मेरू प्रदक्षिणेचा रस्ता तीर्थावरूनच जातो. पर्वकालच्या दिवशी तीर्थस्थान, देवदर्शन आणि मेरू प्रदक्षिणा घडल्यास महापुण्य लाभते असे क्षेत्र महात्म्यात सांगितले आहे. हरिहर तीर्थावर भगवान महादेव व भगवान विष्णु यांची गळाभेट झाल्याची आख्याईका आहे त्यामुळे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक रात्री बारा वाजता एकमेकांची गळाभेट घेतात.
  • नारायण कुंड

    हे तीर्थ श्री वैजनाथ देवालयाच्या उत्तरेकडील दरवाज्या पुढील नव्या घाटा शेजारी आहे. हे तीर्थ चौकोनी कुंडाच्या आकाराचे असून याचे बांधकाम उत्तम व घाटदार आहे. याला नारायण कुंड या नावानेही ओळकले जाते. या तीर्थामध्ये पूर्वेच्या बाजूस नारायणेश्वराचे छोटेसे मंदिर आहे. तीर्थाच्या पूर्वेला एक जुने दत्तमंदिर व राममंदिर आहे. या तीर्थाच्या बाजूस आद्य शंकराचार्य यांचे मंदिर आहे .
  • मार्कंडेय तीर्थ
    हे तीर्थ जुन्या घाटाकडे पूर्वेस असून उत्तम बांधलेले आहे. हे एक तपस्येचे ठिकाण असून सरस्वती नदीच्या काठाला आहे. परळी महात्म्यात सागीतल्याप्रमाणे भृकंद ऋषीनी पुत्रप्राप्त्तीसाठी तपश्चर्या केली होती. पुत्र झाला पण तो अल्पायुषी होणार असा दृष्टान्त झाला. त्यामुळे त्याची आई नेहमी दुखी असायची पुत्राचे नाव मार्कडेय होते. आई वडील दुखी पाहून त्याने तपश्चर्या करण्याचा निर्धार केला. मार्कडेय या प्रभाकर क्षेत्री म्हणजेच परळी येथे येऊन येथील मार्कडेय तीर्थावरील ब्रम्हदेवाने स्थापिलेल्या श्री सिध्देश्वर लिंगापाशी तपश्चर्या केली. त्याने श्री वैजनाथाच्या पिंडीला मिठी मारली, म्हणून श्री वैजनाथला दोन्ही हातांनी कवटाळून दर्शन घेण्याची पद्धत आहे. वैजनाथाने प्रसन्न होऊन सोळा वर्षाऐवजी सोळाकल्पाचे आयुष्य प्रदान केले. मृत्युच्या वेळी यमाचे दर्शन झाले, परंतु शंकराच्या वरप्रसादाने अपमृत्यु टळला. हा वर प्रसाद मार्कडेय तीर्थावर घडला व तेव्हापासून हे तीर्थ मार्कडेय तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले.
  • अमृतकुपी
    हे तीर्थ श्री वैजनाथ मंदिराच्या पूर्वेकडे आहे. या बाबत एक कथा परळी महात्म्यात आहे. येथील वैखानस ब्राम्हण आणि इतर ब्राम्हण श्रीनारायणाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून तीर्थयात्रेसाठी गेले ते ब्राह्मण यमुनेच्या तीरी आल्यानंतर यमुनेच्या कालिया डोहात स्थान करू लागले. तिथे त्यांना कालियाचे विष बाधले. त्यावेळी त्यांच्या बायकांनी गोपिनाथरूपी नागनारायणाची प्रार्थना केली व सौभाग्यदान मागितले त्यामुळे नारायण कृपा होऊन नारायण अमृत कृपिसह प्रगट झाले. त्यांनी ब्राम्हणवर अमृत शिंपून त्यांना सजीव व निरोगी केले. म्हणून संकटहर्त्या नारायणास भक्तजनांनी गोपीनाथ नाव दिले. नारायणाच्या हातातील अमृत कृपी म्हणजेच येथील अमृत कृपी तीर्थ होय.
  • चक्रतीर्थ काकड तळे
    हे तीर्थ परळी गावाच्या दक्षिणेस एका मैलावर डोंगरात आहे. याच्या चोहोबाजूंनी उंच उंच टेकड्या असल्यामुळे यांचा आकार तळ्यासारखा झाला आहे. यास लोक काकड्तळे किंव्हा काकड्तलाव असेही म्हणतात. सध्या या ठिकाणी तीर्था सारखा मोठा जालाशय वगैरे नसून एक गोड्या पाण्याची विहीर आहे. येथील सर्व जमीन काळीभोर असून सर्वत्र सुपीक चिकन माती आहे. याच्या एका बाजूस नंदागौळ हे गाव आहे. परळी महात्म्यात या तीर्था विषयी एक कथा सांगितली आहे. एकदा दक्षप्रजापतीने एक मोठा यज्ञ सुरु केला. यज्ञ समारंभासाठी त्यांनी सर्व देवांना आमंत्रणे दिली पण श्री शंकर त्या दक्षाचे प्रत्यक्ष जावई असून त्यांना आमंत्रण दिले नाही. श्री शंकरांनी आमंत्रण न देण्याचे कारण म्हणजे त्याची विरक्त स्थिती आणि दारिद्र अवस्था. पार्वतीने आपल्या माहेरी होणार्‍या या यज्ञासाठी जाण्याचे ठरवले. श्री शंकरांनी पार्वतीला निमंत्रना वाचून न जाण्याची सूचना केली. परंतु पार्वती न ऐकता ती दक्षयज्ञास गेली. तेथे तिचा अपमान झाला. तिने संतापलेल्या अवस्थेत जळत्या आणि धगधगत्या कुंडात उडी घेतली. श्री शंकरांना हे कळताच त्यांनी तात्काळ वीरभद्र नावाच्या एका पराक्रमी दिव्यपुरुषास उत्पन्न करून दक्षयज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली. श्री शंकराच्या आज्ञेप्रमाणे तो जेव्हा दक्षयज्ञाचा विध्वंस करू लागला तेव्हा सर्व देवांचे व त्याचे मोठे युद्ध झाले या युद्धात श्रीविष्णूनी त्याच्यावर आपले सुदर्शन चक्र सोडले. वीरभद्रने ते अजिंक्य सुदर्शन चक्र गिळून टाकले. तेव्हा आपल्या चक्राच्या पुन:प्राप्तीसाठी श्रीविष्णूंनी प्रभाकरक्षेत्रि येऊन शिवसहस्त्रानामानी व दररोज एक हजार कमळांनी श्री शंकराची पूजा करण्यास आरंभ केला. या अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी श्रीशंकरांनी श्रीविष्णूच्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठी एक कमळ लपवून ठेवले. अनुष्ठांनात एका कमळामुळे अपूर्णता राहू नये म्हणून विष्णूनी आपले नेत्रकमळ श्रीशंकराला वाहून तपाची पूर्णता केली. श्री शंकर प्रसन्न झाले व त्यांनी वीरभद्राने गिळलेले सुदर्शन चक्र श्रीविष्णूस परत केले. आपले सुदर्शन चक्र श्री शंकरकृपेने या क्षेत्रि मिळाले म्हणून श्रीविष्णूनी त्यांच्या स्मरणार्थ येथे चक्रतीर्थ निर्माण केले.
  • सारस्वत कूप
    एकदा चुली नावाचा एक सदाचारी व धर्मापारायण ब्राह्मण चाक्रतीर्थावर तपश्चर्य करू लागला. त्याच्या तेजस्वी आणि प्रखर तपाने इंद्राला धाक पडला कि, हा ब्राह्मण आपल्या तपोबलाने माझे इंद्रपद घेईल म्हणून इंद्राने प्रयत्न केले त्यामुळे एका कमळात एक बालक उत्पन्न झाले. त्यावेळेस सरस्वती देवी तिथे सहजपणे विहार करण्यासाठी आली होती. तिला त्या बालकाचे रडणे ऐकू आले आणि ती त्या बालकापाशी गेली. बालकाला पाहून देवीने त्या बालकाचे संगोपन केले . सरस्वतीने संगोपन केले म्हणून मुलाचे नाव सारस्वत असे ठेवले व त्याला चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराने यात पारंगत केले. त्यापश्यात सारस्वत चक्रतीर्थावर तपानुष्ठान करू लागला. काही काळाने बारा वर्षांचा दुष्काळ पडला. त्यावेळी सरस्वती सारस्वताच्या समाचारासाठी चक्रतीर्थावर आली. पाहते तर काय सारस्वत ध्यान मग्न बसला आहे. सरस्वतीने सारस्वतास जागृत करून त्याला दुष्काळाचे वर्तमान सांगितले आणि देवी म्हणाली ‘मी तुझ्यासाठी जलकूप निर्माण करू देते. या कुपातून जल प्रवाह सतत चालू राहील’. त्यामुळे देवीने निर्माण केलेल्या या कुपास सारस्वत कूप आणि त्यातून वाहणाऱ्या जलप्रवाहास सरस्वती असे नाव दिले.
  • ब्रम्हगंगा
    ब्रह्मगंगा हि नदी महापवित्र असून या श्री क्षेत्राच्या पश्चिमेस एक कोसावर आहे. हिच्या तीरावर ब्रह्मवाडी, जीरेवाडी अशी लहान गावे आहेत. जीरेवाडी जवळच्या एका डोंगरात उंच टेकडीवर सोमेश्वर नावाचे एक प्रसिद्ध शिवलिंग आहे. परळी महात्मात या ब्रम्हगंगा नदीचे आख्यान सांगितले आहे. पूर्वी एक स्वरुपाची नावाचा ब्राह्मण ऋषीच्या कुळात कान्तीपुरी म्हणजे परळीत होऊन गेला. तो मोठा वेदशात्रांत पारंगत आणि सदाचार संपन्न होता. या ब्राह्मणाला पद्मगर्भ नावाचा पुत्र होता. विश्वमित्र या गोत्रातील ब्रह्मगंगा या नावाच्या मुलीबरोबर पद्मगार्भाचा विवाह झाला. माहेरी श्रीमंत असल्यामुळे ब्रह्मगंगा सासरी आल्यानंतर मनसोक्त वागू लागली. सासू सासरे कुलीन असल्यामुळे त्यांना तिची वर्तणूक पसंत पडेनाशी झाली. कितीही उपदेश केला तरी ती मनावर घेत नसे सतत माहेरच्या श्रीमंतीचा अभिमान बोलून दाखवू लागली. एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी वैजनाथाचे दर्शन, उपोषणपारणे हे कुलाचार न पाळता ती आपल्या साज शृंगारात दंग राहिली. त्यामुळे सासूने तिला कुळाचाराची परंपरा व सामाजिक जवाबदारी या दृष्टीने कसे महत्वाचे असते ते समजावून सांगितले. सासूचे बोलणे ऐकून ब्रह्मगंगेचे समाधान न होता ती सासूला उलट उत्तर देऊ लागली. त्यामुळे सासूला राग आला व तिने ‘कृष्णगिरीवर घोरपड होऊन पडशील’ असा शाप दिला. हा शाप ऐकून ब्रह्मगंगा घाबरली आणि तिने सासूची क्षमा मागितली. सासूलाही सुनेची दया आली व तिने उ:शाप दिला व सांगितले, ‘घोरपडीचा जन्म मिळाला तरी तू शिवरात्रीच्या महाव्रतास विसरू नकोस त्या व्रताच्या पुण्याईने श्रीविष्णू ज्या वेळी मोहिनेचे रूप धारण करून देवांना अमृत व असुरांना सुरा पाजतील आणि राहू दैत्याचा आपल्या सुदर्शन चक्राने शिरच्छेद करतील त्यावेळी त्या चक्राचे तेज तुझ्यावर पडेल आणि तुझे घोरपडीचे शरीर नष्ट होऊन तू जलरूप पावशील. तू जलरूप झाल्यावर त्या जलाचा प्रवाह वेनुमतीच्या परम पावन ओघास मिळेल. पुढे हा संगम गोदावरीला जाऊन मिळेल. अशा प्रकारे तुला शंकर सांनिद्ध प्राप्त होऊन तुझा उद्धार होईन. ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पूर्वीचे ब्रह्मगंगा हे नाव तिला देण्यात आले.
  • वेनुमती
    पूर्वी प्राग्योतीष नगरीत चंद्रप्रभा नावाचा एक राजा होता. त्यांच्या राणीचे नाव प्रभा आणि मुलीचे नाव सुलोचना असे होते. सुलोचना अति सुशील, प्रेमळ, सदाचारीव ईश्वरभक्त होती. सुस्वभावामुळे ती सर्वांना प्रिय झालेली होती. तिच्या एका सखीचे नाव वेनुमती होते. वेनुमतीचा स्वभावही सुलोचना सारखा होता. एकदा चंद्रप्रभा राजाकडे एक चित्रकार आला होता. त्याने काढलेली काही चित्रे त्यांनी राजास दाखवले. त्यातील कान्तीपुरी या वैजनाथ नगरीचे व तेथील देवतांची चित्रे राजाला सर्वात जास्त आवडली. त्याने ती चित्रे राणीला व सुलोचनेला तसेच दरबारी मंडळीस दाखविली चित्रकलेच्या कलेचे सर्वानीच कौतुक केले. राजाने ती चित्रे विकत घेतली. सुलोचनेने विचार केला जर चित्रे अशी आहेत तर प्रत्यक्ष कांतिपुरी किती मोहक असेल! ती ते चित्रे पाहण्यात ऐवढी तल्लीन झाली की, भावभत्तीने तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सुलोचनेला त्या चित्राचाच ध्यास लागला. सारख्या त्याच नित्यध्यासाने सुलोचनेवर वैजनाथाची कृपा झाली आणि एके दिवशी ती चित्स्वरुपात विलीन झाली. सुलोचना मृत झालेली पाहून तिची सखी वेनुमती हिने आक्रोश केला वेनुमती घरादाराचा त्याग करून तीर्थयात्रेला निघाली. तीर्थयात्रा करत करत ती कान्तीपुरी या वैजनाथ नगरीत येऊन पोहोचली. चित्रात पाहिलेला देखावा प्रत्यक्ष पाहून तिचे भान हरपले. हरिहर तीर्थात स्थान करून तिने वैजनाथाचे दर्शन घेतले. देवळातील ते शुद्ध आणि पवित्र वातावरण पाहून ती प्रभू वैजनाथाच्या भक्तीत तल्लीन झाली. वेनुमती अतिशुद्ध भक्तीभाव आणि तिची तादात्म्य वृत्ती पाहून वैजनाथाने तिलाही सुलोचनाप्रमाणे विदेह कैवल्य दिले. या महान भक्ताच्या स्मारकासाठी श्री वैजनाथाने आपल्या जटेतील गंगेतून एक पवित्र जलप्रवाह सुरु केला. तो प्रवाहच या क्षेत्रि वेनुमती गंगा या नावाने प्रसिद्ध आहे. हि वेनुमतीगंगा जगाच्या कल्याणाकरता मी उत्पन्न केलेली आहे, असे श्रीवैजनाथ स्वमुखाने सांगतात. या वेनुमातीच्या तीरावर श्री बटुभैरवाचे स्थान आहे येतील श्री गणेशाचे सर्वांचे गुप्तपणे या वेनुमतीच्या तीरावर क्षेत्र संरक्षण करण्यासाठी व विघ्न निवारण करण्यासाठी सदा सिद्ध आहेत म्हणून तिला ‘गणसिद्धी’ असेही नाव प्राप्त झाले आहे.

श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग


श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील एक पवित्र ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र मानले जाते महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ हे तालुक्याचे शहर आहे . परभणी हैद्राबाद रेल्वे मार्गावरील हे एक महत्वाचे जंक्शन आहे . कन्याकुमारी ते उज्जैन या भूमध्यरेषेवर मेरूपर्वत किंवा नागनारायण डोंगराच्या एका टेकडीच्या उतारावर हे क्षेत्र विराजमान आहे . ब्रम्हा, वेणू व सरस्वती या नद्यांचे सान्निध्य यास लाभले आहे . या गावास वैजयंती व जयंतीक्षेत्र या नावांनी पण ओळखले जाते . हे हरिहार मिलनाचे स्थान आहे. त्यामुळे शिव महोत्सवा सोबत कृष्ण महोत्सव ही साजरा केला जातो .बिल्वपत्रासोबत वैकुंठ चतुर्दशीला तुळस ही वाहिली जाते.या माहिती वरून हे स्थान भौगोलिक दृष्ट्या महत्वपूर्ण आहे. मेरूपर्वत या नावाने पर्वत स्थानी हे क्षेत्र वसलेले आहे . संपूर्ण मराठवाड्यात बालाघाट पर्वत पसरलेला आहे. या पर्वताच्या पायथ्याशी श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. पुढे वाचा